Friday, May 14, 2010

किंमत...

(ही कथा काल्पनिक असून तिचा जिवंत व मृत व्यक्ती/गोष्टींशी काहीही संबंध नाही. हे कथानक पूर्णपणे माझ्या मेंदूची उत्पत्ती असून कुठल्याही इतर प्रकारांवरून 'influenced' सुद्धा नाही. त्यामुळे जे आहे ते गोड मानून अभिप्राय कळविणे आणि जर शिव्या घालाव्याश्या वाटल्यास त्याऐवजी फक्त 'उगाच वाचले' एवढे म्हणणे ही विनंती.)


तो सगळं काही शांतपणे ऐकून घेत होता. प्रत्येक शब्द निखार्यासारखा त्याच्या कानात ओतला जात होता. पूर्ण गोष्ट ऐकून झाल्यावर तो म्हणाला, "मीच का? दुसरं कुणी हे करू शकणार नाही का?". दरबारात एक भयाण शांतता पसरली. जो तो एकमेकांकडे बघू लागला. सगळ्यांना सूर्याची व्यथा कळत होती. अत्यंत शांत स्वभावाचा, चंदेरी, शीतल प्रकाशाचा, आनंदी स्वभावाचा होता आणि त्याला ही जबाबदारी? हे म्हणजे अगदीच विरुद्ध होते. प्रत्येकाच्या मनात विचारांचे काहूर होते. आपण काही मदत करू शकतो का हा प्रश्न ज्याला त्याला पडला होता. त्या भयाण शांततेला चिरत जाणारा सत्याविरतचा धीरगंभीर आवाज आला, "कारण तूच ही शक्ती, हे सामर्थ्य पेलू शकतो. केवळ तू आणि तूच ही जबाबदारी पार पडू शकतो." सत्याविरत म्हणजे एक जबरदस्त व्यक्तीमत्व होते. अत्यंत ओजस्वी चेहरा, भेदक डोळे, धिप्पाड असे शरीर आणि त्याचे ते चमकणारे सुंदर चंदेरी केस. कुणीही त्याच्यासमोर बोलायची हिम्मत करू शकत नसे.

सूर्य काही न बोलता बाहेर पडला. जणू तो त्याचाच उरला नव्हता. ब्रह्मलोकातून सत्याविरतला अशी आज्ञा होती की जीवसृष्टीनिर्माणासाठी सूर्याला अग्निबीज कंठस्थ करावे लागेल आणि आपल्या मुलीला जीवसृष्टी निर्माणाकरिता काळचक्री पाठवावे. सूर्य म्हणजे आप्तेष्टांसाठी सदैव मदतीला तयार असे. त्याचा त्याच्या मुली (पृथ्वी) वर फार फार जीव होता आणि ह्याच गोष्टीचा त्याला सगळ्यात जास्त त्रास होत होता. "अग्निबीज ग्रहण केल्यावर मला माझ्या धीटूकलीला कधी बघता पण येणार नाही. तिची काळजी कोण घेईल?". मनात नुसते विचारांचे वादळ आणि भावनांची कालवाकालव होत होती. प्रत्येक क्षणासोबत त्याचा कंठ आणखीनच दाटून येत होता. उत्तर काही मिळत नव्हते. सगळे काही असे सुन्न बधीर झाल्यासारखे वाटत होते.

"खेळता खेळता त्या दिवशी जर पृथ्वी असे बोलली नसती तर? हे सगळं कदाचित टळलं सुद्धा असतं ...कदाचित..."

जीवसृष्टी बद्दलच्या देवाच्या कल्पनेने पृथ्वी अतिशय हूरळून गेली होती. त्यासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागेल ह्याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल तिने. खूप खोल विचार करून शेवटी त्याने पृथ्वीच्या संरक्षणाची एक योजना केली आणि त्याचे विचारांचे काहूर जरा शांत झाले. तो त्या क्षणीच सत्याविरतकडे गेला आणि म्हणाला, " मी अग्निबीज कंठस्थ करण्याआधी माझ्या हृदयाचा एक तुकडा पृथ्वीच्या संरक्षणासाठी देऊ इच्छितो". त्याच्या ह्या बोलण्यामुळे क्षण भर अवाक झालेल्या सत्याविरतला लगेच त्याची व्यथा कळली. "ठीक आहे, पण लक्षात ठेव, तू अग्निबीज घेतल्यावर त्या सामर्थ्याचा परिणाम तुझ्या हृदयाच्या तुकड्यावर देखील होईल" सत्याविरतने त्याला खबरदार केले. मंद स्मित करत तो बोलला, "तिला सतत बघणारा माझ्या हृदयाचा तुकडा (चंद्र) हा शक्तीमान होईल याचे मला समाधानच आहे आणि त्याच्या शक्तीचा फायदा तिच्या रक्षणा करीता नकीच होईल." एव्हाना सूर्याच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव जरा कमी झाले होते.

काळचक्री पाठविण्यापूर्वी सूर्याने तिच्या हाती एक डबी दिली. पृथ्वीला उराशी घटट कवटाळून सूर्य तिला म्हणाला," माझी चिमुरडी...घाबरू नकोस मी आहेच तुझ्याजवळ... हे बघ... ह्या डबीत माझा हृदयाचा तुकडा देतोय. काळचक्री हा सतत तुझ्या सोबत राहील". एका मुलीचे वडील शेवटी ते ... मन वेदनेने आक्रोश करत होते पण चेहऱ्यावर स्मित हास्य होते. त्याने पृथ्वीला शेवटचे अगदी डोळे भरून बघितले. ह्यानंतर तो तिला कधीच बघू शकणार नव्हता. त्याच्या चिमुकलीवर आता मोठी जबाबदारी होती.

"येते मी" हे दोनच शब्द बोलून भरलेल्या डोळ्यांनी ती पुढे निघाली. तिच्या चालण्यात कुठूनसा एक आत्मविश्वास आलेला. जणू ह्या क्षणाला खंबीरपणे सामोरे जायचा तिने निश्चय केलेला होता. पुढच्याच क्षणी एक मोठा हजारो विजांचा प्रकाश पडला सोबत कानठळ्या बसणारा मोठा गडगडाट ऐकू आला. क्षणभर दुरवर घोंघावणारया वाऱ्याचा आवाज आणि जोर जाणवला. पृथ्वी एक एक पावूल पुढे टाकत त्या दैदिप्यमान प्रकाशात दाखल झाली. क्षणभरातच सगळे काही स्तब्ध झाले. प्रकाश लोपला, वारा थांबला. जणू काही सगळे ब्रम्हांड त्या वेळी जागच्याजागी थांबले होते. त्या दिशेने बघणाऱ्या सूर्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. जणू काही त्याच्या सगळ्या भावना त्याच्या धीटूकली सोबतच काळचक्री गेल्या होत्या. सात घटिका नंतर त्याला अग्निबीज कंठस्थ करावे लागणार होते. आता फक्त त्या क्षणाची वाट होती.


2 comments:

  1. वाह! छान ओघवती कथा आहे. डिस्क्लेमर तर भन्नाटच. पृथ्वी सुर्याची मुलगी ही कल्पना आवडली. कथेचं शिर्षक तितकं समर्पक नाही वाटलं. पण ओव्हरऑल मस्त! लगे रहो नेहा जी!

    ReplyDelete
  2. हे हे हे...तुला खरचं आवडली का कथा अभिलाष? Thanks really! अर्धीच लिहिली आहे क्रमश: लिहायचे विसरले, पण मला जरा रटाळवाणी वाटली (to tell u the truth :) आता पुढचा भाग लिहायचा..:-?...

    ReplyDelete