Tuesday, July 22, 2014

ओढ़



.......
आज मनाच्या वस्त्राला हळुवारपणे कुरवाळीत असताना एक धागा अचानक उसवलेला दिसला, कुतूहल म्हणून तो ओढला आणि...मन:पटलाचा तो कधी न चिंतीलेला खोल व्रण दिसला. . उगाच दुखावेल म्हणून मी त्याला तसाच राहू दिले होते. आता इतक्या वर्षानंतर ...माझ्या मनाला नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. खूप गोंधळात होते ते, एकतर खूप जुनी वस्तू गवसल्याचा आनंद, पण त्याच वेळेस त्यापासून इतकी वर्षे दुरावल्याचे दुखः सगळेच कसे एकवटूनच आलेलं.

आजोळी, गावाच्या ओढ्याजवळ आम्ही मैत्रिणी खेळत होतो, खूप आनंदात होते मी, शहरात अशी मोकळी जागा, निळे आकाश, स्वच्छ थंड हवा कुठे मिळत होते? आनंदाच्या भरात खेळत असताना माझा तोल सुटला आणि मी पाण्यात पडले. सोबत असलेल्या मैत्रिणी खूप हसू लागल्या, मला जरा रागच आला होता त्यांचा. पण मग उठल्यावर लगेच विसर पडला. तेव्हा मन पण किती निरागस असतं ना? तेव्हा खडकामागून कुणीतरी बघत असल्याचे जाणवले. माझे ह्रदय प्रचंड धड़धड़त होते कोण असेल तिथे? एका क्षणात माला त्य ठिकाणी फ़क्त मी अणि तो व्यक्ती असे दोघेच आहोत असे वाटून गेले

आम्ही सर्व मैत्रिणीनी घराकडे धूम ठोकली, आजी वाट बघतच होती. 'काय ग गधडे, कपडे कसे काय एवढे मळलेत ?' 'आजी, मी पडले अग खेळता खेळता..' 'अग काय मुली तुम्ही ...तुम्हाला काही म्हणून उपयोग नाही..चल लवकर हातपाय धु आपल्याला देवळात जायचे आहे आज किर्तन आहे'. गावात एकच विठोबाचे मोठे मंदिर होते आणि आठवड्यातून २-३ वेळा किर्तन असायचे. आम्हा लहान मुलांची खूप धूम असायची. थोडा वेळ किर्तन ऐकले कि आम्ही देवळाच्या बाहेरच्या पारावर जावून खेळायचो. त्या दिवशी पण मी तयार झाले होते, माझ्या मैत्रिणी जरा माझ्यापेक्षा लहान होत्या मी १३ -१४ वर्षाची असेन. कधी कधी आरशात स्वतःकडे बघताना कशी दिसते मी ? असा विचार करत उगीच केसांची एक बट डोळ्यांवर घ्यायचे. हळूच कधी त्या कोवळ्या वयात प्रवेश केला कळले देखील नाही. पण मी मुद्दामच त्या विचारांकडे दुर्लक्ष करून गावी खेळण्यात आणि मज्जा करण्यात जास्त रमत असे. त्या संध्याकाळी तयार होवून मावशीने लंडन वरून पाठवलेला फिकट गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला. आजी माझ्याकडे बघून हसली व माजघरात जावून तिने ..कोळसा मिरे मीठ कि काही आणून माझी नजर काढली. खरे तर ह्या गोष्टींमध्ये माझा जास्त विश्वास नव्हता, पण केवळ तिला बरे वाटावे म्हणून मी गप्प होते. आम्ही दोघी देवळाकडे जायला निघालो. आजोबा अगोदरच तिथे पोचले होते. किर्तन चालू व्हायला अवकाश होता. आम्ही दर्शन घेवून बसलो. मी हळू हळू एकेक व्यक्तीला न्याहाळत होते. शिर्के आजोबा आपला जाड चष्मा डोळ्यांवर चढवत पोथी वाचत होते. नंदा काकी आपल्या मुलाला मांडीवर घेवून थोपटत होत्या. त्याची छोटी सुलू त्यांना रेलून कधीच झोपी गेली होती. केळकर काका एक मोठा लाईट बसवत होते. रंगादादा सर्वाना पाणी देत होता. का कुणास ठावूक आज मला मनात एक सुंदर आल्हाददायक असे काहीसे होत होते. मी स्वतःशीच विचार करत परत माझे निरीक्षण चालु केले. शिर्के आजोबा, घाडगे काका, त्र्यंबक दादा, केशव, चिंग्या, शेट्या (त्याचे प्रत्यक्ष नाव छान किरण असे होते पण त्याचे पोट एखाद्या शेठ प्रमाणे दिसत असल्याने मुलं त्याला शेट्या म्हणायची), आन्द्या (आनंद) अशी माझी नजर हळू हळू पुढे जात एकदम थबकली ..मंदिराच्या पारावर बसलेला एक मुलगा माझ्याचकडे बघत होता, मी एकदम ओशाळून दुसरीकडे बघितले, जरा वेळाने हिम्मत करून परत त्या दिशेने बघितले तर तिथे कुणीच नव्हते. मी दुर्लक्ष करून आजी सोबत बोलू लागले. तेवढ्यात किर्तन चालु झाले. बराच वेळ किर्तन चालु होते. नंतर आम्ही मुलं बाहेरच्या पाराकडे पळालो. माझ्या मागे कुणीतरी येत असल्याचे मला जाणवले, मागे वळून बघितले तर तोच मुलगा होता..मला काळजात धस्स झाले..का कुणास ठावूक..तशी मी बरीच धीट होते. तो वेगात पावले टाकत पुढे येवून मला म्हणाला..तू मागच्या उन्हाळ्यात नाही आलीस गावात? मी एकदम घाबरले हा कोण आणि का विचारतोय मला आणि ह्याला कसे माहित मी मागल्या उन्हाळ्यात नाही आले ते. मनात नुसता विचारांचा कल्लोळ चालु असताना तो एकदम पुढे येवून म्हणाला, 'दूपारी तू पडलीस.. लागले तर नाही ना? ओढ्याच्या खडकाजवळ मीच होतो तेव्हा बघितले तुला पडताना'. माझा गोंधळ आणखीनच वाढला. माझी नजर त्याच्या भेदक नजरेत जशी लॉक झाली होती. नकळत एकटक त्याच्या कडे बघत मी, ' पण तू..म्हणजे..तुला कसे?...मी तुला नाही ओळखत' असे काहीतरी घाबरत घाबरत बोलून पुढे जायला निघाले. तर त्याने माझा हात पकडून मला त्याच्याकडे ओढले. आता मी किंचाळणारच होते तेवढ्यात तो म्हणाला ,' अग, ऐक तरी..' असे त्याचे मधाळ शब्द कानात पडताच माझा राग कुठल्या कुठे पळाला आणि हृदय मात्र अजूनही धडधडतच होते. 'नेहा, तू येतेस कि आम्ही जाऊ पुढे?' मीना आणि शीतल मला ओरडून विचारात होत्या. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. जणू काही मला कुणी संमोहित केले होते. मी नुसतीच मान डोलवली..त्याचा अर्थ त्यांनी, ' मी येतेय तुम्ही व्हा पुढे' असा लावला. आता मात्र त्या भेदक डोळ्यात मला एक मिश्कील छटा दिसली. माझी हृदयाची धडधड आणखीनच वाढली. मी कधीच कुणा मुलाला इतक्या बारकाईने..आणि इतक्या जवळून बघितले नव्हते. तो माझ्याकडे बघत, किंचित हसत, काही उत्तराच्या अपेक्षेने उभा होता त्याला मी जन्मो-जन्मी ओळखते असे मला वाटत होते. कारण त्याच्या बोलण्यात एक सहजता होती...एक ओलावा होता...आणि हक्क पण होता. मी इतका का विचार करत होते? तो शेवटी माझ्यासाठी अनोळखीच होता ना? मग का माझे हृदय मला त्याच्याकडे ओढत होते?
...

To be contd...