Tuesday, May 11, 2010

कूट श्लोकांचा जन्म...

आहाहा ...हिरवा निसर्ग ..!

पुढे काही बोलायलाच नको. चित्रच उभे राहते नं डोळ्यासमोर?
सकाळपासूनच सगळीकडे एक वेगळा उत्साह दिसत होता. आज अगदी सगळं स्वच्छ, निर्मळ दिसत होतं. पुण्याच्या सिन्हगडावरची थंडगार हवा...आजूबाजूला हिरवी गार झाडे आपली नवीन कोवळी पालवी डौलाने मिरवत होते. मधेच कुठलं तरी एक लालचुटूक रंगाचं फुल काही खाना खुणा करत होतं. ह्या अप्रतीम दृश्याचे अमृत मी आपल्या नेत्रारुपी द्रोंणाने प्राशन करीत होते... अग काय हे? अती झाले ना जरा..?? दोन गोष्टी काय लिहिल्यास काय कालिदास समजायला लागलीस कि काय स्वत:ला? (स्वगत)

सोप्या भाषेत...आज वेदर सॉलीड जबरदस्त होतं. सगळीकडे ग्रीनरी होती. बाजूला एक छान लाल फुल आलेलं झुडूप आणि अश्या सुंदर वातावरणात मी एकीकडे कॉफीचा कप आणि एकीकडे कांदाभजीची प्लेट, असे स्वर्गीय सुख अनुभवत होते. [ :) आता जरा नॉर्मल वाटते नाही का? :))]

खरं म्हणजे मला खूप इच्छा आहे एकदा असा उपमेने नटलेला, सजलेला...असा श्रीमंत लेख लिहिण्याचा. पण काही लिहायला घेतलं की, असं वाटतं की उगा धाडस नको आधीच मराठी कच्चं...त्यात प्रयोग नको...लिखाण म्हटले की मला महर्षी वेदव्यास, कालिदास, वाल्मिकी अशी भली थोरली नावं अशी ४० नंबरच्या अक्षराच्या साईझ मध्ये दिसायला लागतात. :( ..मनात विचार येतो कसे काय ह्यांनी इतकी मोठी लिखाण कामं केली असेल? आमच्या संस्कृतच्या शिक्षिका नेहमी म्हणायच्या.

"व्यासोऽच्छी‌‌ष्टम् जगत् सर्वं |"

अर्थात्... महर्षी वेदव्यासांनी सगळे जग उष्टे केले. कसं काय बुवा जमलं असावं हे त्यांना? एकही विषय असा राहिला नाही कि ज्यावर व्यासांनी काही लिहिले नाही...???? व्यासांचे नाव निघाले कि मला त्यांची एक कथा जी नेहमी मनात घोळत असते ती प्रकर्षाने आठवते. ती अशी ...

एकदा काय झालं की महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिहायला घेतले...पण महर्षी वेदव्यास म्हणजे कल्पनांचा, साहित्याचा सागर. त्यांच्याकडे अमाप दौलत होती विचारांची... ती दौलत आणि लिहिण्याचा वेग हे समीकरण काही जमेना...त्यांना एका क्षणार्धात म्हणे कितीतरी हजार श्लोक सुचायचे...:-? (काश..मै वो सब देख सकती)

Anyway...त्यांनी शेवटी विद्येची देवता गणपतींची मदत घ्यायचे ठरविले. मजेदार गोष्ट अशी कि, आपले देव देवता ना... सरळ पणे हो किंवा नाही म्हणणार नाही...काहीतरी तिसरा मार्ग काढतील. ह्या आपल्या गोष्टीत पण तसेच घडले.

आपले गणपती बाप्पा हो म्हटले खरे, पण एका अटीवर..."मी लिहेन पण मला सांगताना तू एक क्षण भर जरी थांबलास तरी मी पुढे लिहिणार नाही". आता मात्र महर्षी वेदव्यासांच्या समोर प्रश्न होता, "नाही म्हटले तरी क्षणाचा १०० वा भाग इतका तरी वेळ मला पुढच्या श्लोकांसाठी लागेल. काय बरे करावे...??" अचानक त्यांना एक कल्पना सुचली आणि ते गणपतीना म्हणाले, "चालेल, पण माझीही एक अट आपल्याला मान्य करावी लागेल." गणपतीनी व्यासांकडे केवळ एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. "तुम्ही लिहिताना सगळे श्लोक समजून लिहावे लागतील हीच माझी अट" व्यास म्हणाले.

गणपतीनी ह्याला मंजुरी दिली. मग काय विचारता...इकडे ना थांबता वेदव्यास महाभारत कथन करत आहेत आणि इकडे अगदी क्षणभरही न थांबता गणपती लिहीत आहेत. कथन - लिखाण... कथन - लिखाण... असे non stop...चालू होते. मग मध्ये कधी एक वेळ अशी यायची कि, वेद्व्यासांच्या कल्पना आणि गणेशांची लेखणी अगदी बरोबरीला यायची ...आणि अश्या वेळी वेदव्यास कूट श्लोक सांगायचे( कूट श्लोक म्हणजे जे वाचकाला गोंधळून टाकतील... म्हणजे कथेच्या ओघाच्या विरुद्ध अर्थाचे श्लोक असायचे).

गणपतीना त्या कूट श्लोकांचा अर्थ समजायला क्षणार्ध लागायचा, आधी तसे ठरले होते ना कि सगळे श्लोक समजून लिहावे लागतील म्हणून. तर त्या तेवढ्या वेळात व्यास आपले पुढचे कितीतरी हजार श्लोक बनवून तयार ठेवायचे. परत वेग सारखा व्हायला लागला तर परत एक कूट श्लोक. (पूलं बोलले असते ," अरे वा, भलतीच मजा आहे"). एकंदरीत असे ते महाभारत कथा आणि लिखाणाचे गणित होते.

एक मला श्लोक अंधुकसा आठवतो.
केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:।
रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव ॥*

आता वाचकाला प्रश्न पडतो कि, कृष्णाच्या पाण्यात पडण्यामुळे पांडव का खुश झाले आणि कौरव का रडले? जेव्हा कि उलट व्ह्यायला हवे होते? ह्या श्लोकात 'पांडव' चा अर्थ म्हणजे 'पाण्यातील मासे' असा तर 'कौरव 'म्हणजे 'झाडावरचे कावळे' असा आहे. ह्याचा भावार्थ असा,
कुणाचे तरी शव( प्रेत) पाण्यात पडले, मासे खुश झाले पण कावळे दु:खी झाले.
तर असले भरपूर श्लोक महाभारतात आहे असे म्हणतात. महाभारताच्या पहिल्या वाचकाला भरपूर फिल्टर करावे लागले असेल नाही? (j.k.)

महर्षी व्यासांनी ह्या ग्रन्थाद्वारे जवळपास सगळ्याच विषयांबद्दल लिहिले आहे. जन्म, मृत्यू,संगोपन, विद्या शिक्षण, मनुष्य-स्वभाव, शत्रास्त्रे, खेळ, वास्तुशिल्पकारिता, आचार, विचार, संस्कार, वनस्पती, निसर्ग, इ. इ. एकूण काय...सगळेच जे माझ्या क्षुद्र मेंदूत येईल ते सगळे विषय अगदी मुद्देसूदपणे सविस्तर लिहिलेले आहेत. मी मूळ महाभारत वाचले नाही ...जो ग्रंथ घरी होता तो कितव्या आवृत्तीचा होता ते आता आठवतही नाही.

लिखाणाच्या बाबतीत मला नेहमी complex वाटायचा (मला न्यूनगंड हा शब्द अजिबात आवडत नाही का कुणास ठावूक?) आणि अजूनही वाटतो. आपल्या आधीच्या लोकांनी लिखाण कामात इतके मोठे बेन्च्मार्क्स उभे केले आहेत ना कि कधी कधी असे वाटते...असो... उगाच भावनावेगाने काही बोलून जायचे ...

तर सांगायचा मुद्दा असा कि असे कूट श्लोक जर तुम्हाला कुणाला आणखी माहित असतील तर कृपा करून कळवा.

माझी कांदाभजी ची प्लेट माझ्याकडे कधीपासूनची बघत आहे तर तिला न्याय द्यायलाच हवा. केवळ त्यामुळे हा ब्लॉग इथेच थांबवते नाहीतर माझ्याकडे पण व्यासांसारखा खूप मोठा कल्पनांचा सागर.... नाही पण एक छोटे डबके आहे! lolz...


(*हा श्लोक "निल्या म्हणे (http://nilyamhane.blogspot.com/)" च्या सांगण्याप्रमाणे दुरुस्त केला आहे. धन्यवाद!)
--------------------------------------******--------------------------------------

8 comments:

  1. माझ्याकडे पण व्यासांसारखा खूप मोठा कल्पनांचा सागर.... नाही पण एक छोटे डबके आहे. हा हा हा.... हे आवडलं. तुझं मराठी कच्चं आहे म्हणालीस... संस्कृतबद्दल काही बोलली नाहीस. तुझ्या ब्लॉगचे अमृत मी पण नेत्रदृपी द्रोणाने प्राशन केले ;-) मस्त!

    ता.क: मला कांदाभजी देणार होतीस तु by the way :-w

    ReplyDelete
  2. :D...Thanks Abhilash! कांदाभजी मिळणार फक्त थांबायचं जरा...reetsar invitation denaar.
    संस्कृत बद्दल काय बोलू अरे..माझा सुदैवाने फार आवडता विषय पण दुर्दैवाने ठीकी ठाकी येतो.:D...बाकी जमतंय तुला अगदी IM style :-w वगैरे.

    ReplyDelete
  3. हा हा झक्कास.. संस्कृत फार जिव्हाळ्याचा विषय आहे वाटतं तुझा (तुझा चालेल ना?) ... छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  4. धन्यवाद! चालेल म्हणजे काय अगदी...नो प्रोब्लेम (अगदी गुज्जू माणसाने बोलल्यासारखे वाटते... :) संस्कृत खरं तर पुढे शिकावेसे वाटत होते पण क्षेत्र पूर्णपणे बदलल्यामुळे..:(((

    ReplyDelete
  5. पोह्यांवरच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !
    तो श्लोक असा आहे.

    केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:।
    रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव ॥

    ReplyDelete
  6. @ निल्या... अनेक धन्यवाद! मूळ श्लोक सांगितल्याबद्दल..लगेच बदल करते आणि तुझे ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete
  7. Your writing skills are really great.. I wish you write more and more blogs... I am happy that atleast few people are trying to preserve the richness of our language.

    ReplyDelete
  8. मी आहे मराठी, अनेकानेक धन्यवाद! अश्या अभिप्रायानेच सुंदर फुलांचे बीच रोवल्या जातात असे ऐकण्यात आहे. तसा मी प्रयत्न करते आहेच ब्लॉगवर प्रामाणिकपणे माझ्या विचारांची धूळ माती टाकण्याची, आता किती फुले उगवतील बघुया. हा हा हा !

    Thanks for reading!

    ReplyDelete