Tuesday, July 22, 2014

ओढ़



.......
आज मनाच्या वस्त्राला हळुवारपणे कुरवाळीत असताना एक धागा अचानक उसवलेला दिसला, कुतूहल म्हणून तो ओढला आणि...मन:पटलाचा तो कधी न चिंतीलेला खोल व्रण दिसला. . उगाच दुखावेल म्हणून मी त्याला तसाच राहू दिले होते. आता इतक्या वर्षानंतर ...माझ्या मनाला नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. खूप गोंधळात होते ते, एकतर खूप जुनी वस्तू गवसल्याचा आनंद, पण त्याच वेळेस त्यापासून इतकी वर्षे दुरावल्याचे दुखः सगळेच कसे एकवटूनच आलेलं.

आजोळी, गावाच्या ओढ्याजवळ आम्ही मैत्रिणी खेळत होतो, खूप आनंदात होते मी, शहरात अशी मोकळी जागा, निळे आकाश, स्वच्छ थंड हवा कुठे मिळत होते? आनंदाच्या भरात खेळत असताना माझा तोल सुटला आणि मी पाण्यात पडले. सोबत असलेल्या मैत्रिणी खूप हसू लागल्या, मला जरा रागच आला होता त्यांचा. पण मग उठल्यावर लगेच विसर पडला. तेव्हा मन पण किती निरागस असतं ना? तेव्हा खडकामागून कुणीतरी बघत असल्याचे जाणवले. माझे ह्रदय प्रचंड धड़धड़त होते कोण असेल तिथे? एका क्षणात माला त्य ठिकाणी फ़क्त मी अणि तो व्यक्ती असे दोघेच आहोत असे वाटून गेले

आम्ही सर्व मैत्रिणीनी घराकडे धूम ठोकली, आजी वाट बघतच होती. 'काय ग गधडे, कपडे कसे काय एवढे मळलेत ?' 'आजी, मी पडले अग खेळता खेळता..' 'अग काय मुली तुम्ही ...तुम्हाला काही म्हणून उपयोग नाही..चल लवकर हातपाय धु आपल्याला देवळात जायचे आहे आज किर्तन आहे'. गावात एकच विठोबाचे मोठे मंदिर होते आणि आठवड्यातून २-३ वेळा किर्तन असायचे. आम्हा लहान मुलांची खूप धूम असायची. थोडा वेळ किर्तन ऐकले कि आम्ही देवळाच्या बाहेरच्या पारावर जावून खेळायचो. त्या दिवशी पण मी तयार झाले होते, माझ्या मैत्रिणी जरा माझ्यापेक्षा लहान होत्या मी १३ -१४ वर्षाची असेन. कधी कधी आरशात स्वतःकडे बघताना कशी दिसते मी ? असा विचार करत उगीच केसांची एक बट डोळ्यांवर घ्यायचे. हळूच कधी त्या कोवळ्या वयात प्रवेश केला कळले देखील नाही. पण मी मुद्दामच त्या विचारांकडे दुर्लक्ष करून गावी खेळण्यात आणि मज्जा करण्यात जास्त रमत असे. त्या संध्याकाळी तयार होवून मावशीने लंडन वरून पाठवलेला फिकट गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला. आजी माझ्याकडे बघून हसली व माजघरात जावून तिने ..कोळसा मिरे मीठ कि काही आणून माझी नजर काढली. खरे तर ह्या गोष्टींमध्ये माझा जास्त विश्वास नव्हता, पण केवळ तिला बरे वाटावे म्हणून मी गप्प होते. आम्ही दोघी देवळाकडे जायला निघालो. आजोबा अगोदरच तिथे पोचले होते. किर्तन चालू व्हायला अवकाश होता. आम्ही दर्शन घेवून बसलो. मी हळू हळू एकेक व्यक्तीला न्याहाळत होते. शिर्के आजोबा आपला जाड चष्मा डोळ्यांवर चढवत पोथी वाचत होते. नंदा काकी आपल्या मुलाला मांडीवर घेवून थोपटत होत्या. त्याची छोटी सुलू त्यांना रेलून कधीच झोपी गेली होती. केळकर काका एक मोठा लाईट बसवत होते. रंगादादा सर्वाना पाणी देत होता. का कुणास ठावूक आज मला मनात एक सुंदर आल्हाददायक असे काहीसे होत होते. मी स्वतःशीच विचार करत परत माझे निरीक्षण चालु केले. शिर्के आजोबा, घाडगे काका, त्र्यंबक दादा, केशव, चिंग्या, शेट्या (त्याचे प्रत्यक्ष नाव छान किरण असे होते पण त्याचे पोट एखाद्या शेठ प्रमाणे दिसत असल्याने मुलं त्याला शेट्या म्हणायची), आन्द्या (आनंद) अशी माझी नजर हळू हळू पुढे जात एकदम थबकली ..मंदिराच्या पारावर बसलेला एक मुलगा माझ्याचकडे बघत होता, मी एकदम ओशाळून दुसरीकडे बघितले, जरा वेळाने हिम्मत करून परत त्या दिशेने बघितले तर तिथे कुणीच नव्हते. मी दुर्लक्ष करून आजी सोबत बोलू लागले. तेवढ्यात किर्तन चालु झाले. बराच वेळ किर्तन चालु होते. नंतर आम्ही मुलं बाहेरच्या पाराकडे पळालो. माझ्या मागे कुणीतरी येत असल्याचे मला जाणवले, मागे वळून बघितले तर तोच मुलगा होता..मला काळजात धस्स झाले..का कुणास ठावूक..तशी मी बरीच धीट होते. तो वेगात पावले टाकत पुढे येवून मला म्हणाला..तू मागच्या उन्हाळ्यात नाही आलीस गावात? मी एकदम घाबरले हा कोण आणि का विचारतोय मला आणि ह्याला कसे माहित मी मागल्या उन्हाळ्यात नाही आले ते. मनात नुसता विचारांचा कल्लोळ चालु असताना तो एकदम पुढे येवून म्हणाला, 'दूपारी तू पडलीस.. लागले तर नाही ना? ओढ्याच्या खडकाजवळ मीच होतो तेव्हा बघितले तुला पडताना'. माझा गोंधळ आणखीनच वाढला. माझी नजर त्याच्या भेदक नजरेत जशी लॉक झाली होती. नकळत एकटक त्याच्या कडे बघत मी, ' पण तू..म्हणजे..तुला कसे?...मी तुला नाही ओळखत' असे काहीतरी घाबरत घाबरत बोलून पुढे जायला निघाले. तर त्याने माझा हात पकडून मला त्याच्याकडे ओढले. आता मी किंचाळणारच होते तेवढ्यात तो म्हणाला ,' अग, ऐक तरी..' असे त्याचे मधाळ शब्द कानात पडताच माझा राग कुठल्या कुठे पळाला आणि हृदय मात्र अजूनही धडधडतच होते. 'नेहा, तू येतेस कि आम्ही जाऊ पुढे?' मीना आणि शीतल मला ओरडून विचारात होत्या. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. जणू काही मला कुणी संमोहित केले होते. मी नुसतीच मान डोलवली..त्याचा अर्थ त्यांनी, ' मी येतेय तुम्ही व्हा पुढे' असा लावला. आता मात्र त्या भेदक डोळ्यात मला एक मिश्कील छटा दिसली. माझी हृदयाची धडधड आणखीनच वाढली. मी कधीच कुणा मुलाला इतक्या बारकाईने..आणि इतक्या जवळून बघितले नव्हते. तो माझ्याकडे बघत, किंचित हसत, काही उत्तराच्या अपेक्षेने उभा होता त्याला मी जन्मो-जन्मी ओळखते असे मला वाटत होते. कारण त्याच्या बोलण्यात एक सहजता होती...एक ओलावा होता...आणि हक्क पण होता. मी इतका का विचार करत होते? तो शेवटी माझ्यासाठी अनोळखीच होता ना? मग का माझे हृदय मला त्याच्याकडे ओढत होते?
...

To be contd...

Friday, May 14, 2010

किंमत...

(ही कथा काल्पनिक असून तिचा जिवंत व मृत व्यक्ती/गोष्टींशी काहीही संबंध नाही. हे कथानक पूर्णपणे माझ्या मेंदूची उत्पत्ती असून कुठल्याही इतर प्रकारांवरून 'influenced' सुद्धा नाही. त्यामुळे जे आहे ते गोड मानून अभिप्राय कळविणे आणि जर शिव्या घालाव्याश्या वाटल्यास त्याऐवजी फक्त 'उगाच वाचले' एवढे म्हणणे ही विनंती.)


तो सगळं काही शांतपणे ऐकून घेत होता. प्रत्येक शब्द निखार्यासारखा त्याच्या कानात ओतला जात होता. पूर्ण गोष्ट ऐकून झाल्यावर तो म्हणाला, "मीच का? दुसरं कुणी हे करू शकणार नाही का?". दरबारात एक भयाण शांतता पसरली. जो तो एकमेकांकडे बघू लागला. सगळ्यांना सूर्याची व्यथा कळत होती. अत्यंत शांत स्वभावाचा, चंदेरी, शीतल प्रकाशाचा, आनंदी स्वभावाचा होता आणि त्याला ही जबाबदारी? हे म्हणजे अगदीच विरुद्ध होते. प्रत्येकाच्या मनात विचारांचे काहूर होते. आपण काही मदत करू शकतो का हा प्रश्न ज्याला त्याला पडला होता. त्या भयाण शांततेला चिरत जाणारा सत्याविरतचा धीरगंभीर आवाज आला, "कारण तूच ही शक्ती, हे सामर्थ्य पेलू शकतो. केवळ तू आणि तूच ही जबाबदारी पार पडू शकतो." सत्याविरत म्हणजे एक जबरदस्त व्यक्तीमत्व होते. अत्यंत ओजस्वी चेहरा, भेदक डोळे, धिप्पाड असे शरीर आणि त्याचे ते चमकणारे सुंदर चंदेरी केस. कुणीही त्याच्यासमोर बोलायची हिम्मत करू शकत नसे.

सूर्य काही न बोलता बाहेर पडला. जणू तो त्याचाच उरला नव्हता. ब्रह्मलोकातून सत्याविरतला अशी आज्ञा होती की जीवसृष्टीनिर्माणासाठी सूर्याला अग्निबीज कंठस्थ करावे लागेल आणि आपल्या मुलीला जीवसृष्टी निर्माणाकरिता काळचक्री पाठवावे. सूर्य म्हणजे आप्तेष्टांसाठी सदैव मदतीला तयार असे. त्याचा त्याच्या मुली (पृथ्वी) वर फार फार जीव होता आणि ह्याच गोष्टीचा त्याला सगळ्यात जास्त त्रास होत होता. "अग्निबीज ग्रहण केल्यावर मला माझ्या धीटूकलीला कधी बघता पण येणार नाही. तिची काळजी कोण घेईल?". मनात नुसते विचारांचे वादळ आणि भावनांची कालवाकालव होत होती. प्रत्येक क्षणासोबत त्याचा कंठ आणखीनच दाटून येत होता. उत्तर काही मिळत नव्हते. सगळे काही असे सुन्न बधीर झाल्यासारखे वाटत होते.

"खेळता खेळता त्या दिवशी जर पृथ्वी असे बोलली नसती तर? हे सगळं कदाचित टळलं सुद्धा असतं ...कदाचित..."

जीवसृष्टी बद्दलच्या देवाच्या कल्पनेने पृथ्वी अतिशय हूरळून गेली होती. त्यासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागेल ह्याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल तिने. खूप खोल विचार करून शेवटी त्याने पृथ्वीच्या संरक्षणाची एक योजना केली आणि त्याचे विचारांचे काहूर जरा शांत झाले. तो त्या क्षणीच सत्याविरतकडे गेला आणि म्हणाला, " मी अग्निबीज कंठस्थ करण्याआधी माझ्या हृदयाचा एक तुकडा पृथ्वीच्या संरक्षणासाठी देऊ इच्छितो". त्याच्या ह्या बोलण्यामुळे क्षण भर अवाक झालेल्या सत्याविरतला लगेच त्याची व्यथा कळली. "ठीक आहे, पण लक्षात ठेव, तू अग्निबीज घेतल्यावर त्या सामर्थ्याचा परिणाम तुझ्या हृदयाच्या तुकड्यावर देखील होईल" सत्याविरतने त्याला खबरदार केले. मंद स्मित करत तो बोलला, "तिला सतत बघणारा माझ्या हृदयाचा तुकडा (चंद्र) हा शक्तीमान होईल याचे मला समाधानच आहे आणि त्याच्या शक्तीचा फायदा तिच्या रक्षणा करीता नकीच होईल." एव्हाना सूर्याच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव जरा कमी झाले होते.

काळचक्री पाठविण्यापूर्वी सूर्याने तिच्या हाती एक डबी दिली. पृथ्वीला उराशी घटट कवटाळून सूर्य तिला म्हणाला," माझी चिमुरडी...घाबरू नकोस मी आहेच तुझ्याजवळ... हे बघ... ह्या डबीत माझा हृदयाचा तुकडा देतोय. काळचक्री हा सतत तुझ्या सोबत राहील". एका मुलीचे वडील शेवटी ते ... मन वेदनेने आक्रोश करत होते पण चेहऱ्यावर स्मित हास्य होते. त्याने पृथ्वीला शेवटचे अगदी डोळे भरून बघितले. ह्यानंतर तो तिला कधीच बघू शकणार नव्हता. त्याच्या चिमुकलीवर आता मोठी जबाबदारी होती.

"येते मी" हे दोनच शब्द बोलून भरलेल्या डोळ्यांनी ती पुढे निघाली. तिच्या चालण्यात कुठूनसा एक आत्मविश्वास आलेला. जणू ह्या क्षणाला खंबीरपणे सामोरे जायचा तिने निश्चय केलेला होता. पुढच्याच क्षणी एक मोठा हजारो विजांचा प्रकाश पडला सोबत कानठळ्या बसणारा मोठा गडगडाट ऐकू आला. क्षणभर दुरवर घोंघावणारया वाऱ्याचा आवाज आणि जोर जाणवला. पृथ्वी एक एक पावूल पुढे टाकत त्या दैदिप्यमान प्रकाशात दाखल झाली. क्षणभरातच सगळे काही स्तब्ध झाले. प्रकाश लोपला, वारा थांबला. जणू काही सगळे ब्रम्हांड त्या वेळी जागच्याजागी थांबले होते. त्या दिशेने बघणाऱ्या सूर्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. जणू काही त्याच्या सगळ्या भावना त्याच्या धीटूकली सोबतच काळचक्री गेल्या होत्या. सात घटिका नंतर त्याला अग्निबीज कंठस्थ करावे लागणार होते. आता फक्त त्या क्षणाची वाट होती.


Tuesday, May 11, 2010

कूट श्लोकांचा जन्म...

आहाहा ...हिरवा निसर्ग ..!

पुढे काही बोलायलाच नको. चित्रच उभे राहते नं डोळ्यासमोर?
सकाळपासूनच सगळीकडे एक वेगळा उत्साह दिसत होता. आज अगदी सगळं स्वच्छ, निर्मळ दिसत होतं. पुण्याच्या सिन्हगडावरची थंडगार हवा...आजूबाजूला हिरवी गार झाडे आपली नवीन कोवळी पालवी डौलाने मिरवत होते. मधेच कुठलं तरी एक लालचुटूक रंगाचं फुल काही खाना खुणा करत होतं. ह्या अप्रतीम दृश्याचे अमृत मी आपल्या नेत्रारुपी द्रोंणाने प्राशन करीत होते... अग काय हे? अती झाले ना जरा..?? दोन गोष्टी काय लिहिल्यास काय कालिदास समजायला लागलीस कि काय स्वत:ला? (स्वगत)

सोप्या भाषेत...आज वेदर सॉलीड जबरदस्त होतं. सगळीकडे ग्रीनरी होती. बाजूला एक छान लाल फुल आलेलं झुडूप आणि अश्या सुंदर वातावरणात मी एकीकडे कॉफीचा कप आणि एकीकडे कांदाभजीची प्लेट, असे स्वर्गीय सुख अनुभवत होते. [ :) आता जरा नॉर्मल वाटते नाही का? :))]

खरं म्हणजे मला खूप इच्छा आहे एकदा असा उपमेने नटलेला, सजलेला...असा श्रीमंत लेख लिहिण्याचा. पण काही लिहायला घेतलं की, असं वाटतं की उगा धाडस नको आधीच मराठी कच्चं...त्यात प्रयोग नको...लिखाण म्हटले की मला महर्षी वेदव्यास, कालिदास, वाल्मिकी अशी भली थोरली नावं अशी ४० नंबरच्या अक्षराच्या साईझ मध्ये दिसायला लागतात. :( ..मनात विचार येतो कसे काय ह्यांनी इतकी मोठी लिखाण कामं केली असेल? आमच्या संस्कृतच्या शिक्षिका नेहमी म्हणायच्या.

"व्यासोऽच्छी‌‌ष्टम् जगत् सर्वं |"

अर्थात्... महर्षी वेदव्यासांनी सगळे जग उष्टे केले. कसं काय बुवा जमलं असावं हे त्यांना? एकही विषय असा राहिला नाही कि ज्यावर व्यासांनी काही लिहिले नाही...???? व्यासांचे नाव निघाले कि मला त्यांची एक कथा जी नेहमी मनात घोळत असते ती प्रकर्षाने आठवते. ती अशी ...

एकदा काय झालं की महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिहायला घेतले...पण महर्षी वेदव्यास म्हणजे कल्पनांचा, साहित्याचा सागर. त्यांच्याकडे अमाप दौलत होती विचारांची... ती दौलत आणि लिहिण्याचा वेग हे समीकरण काही जमेना...त्यांना एका क्षणार्धात म्हणे कितीतरी हजार श्लोक सुचायचे...:-? (काश..मै वो सब देख सकती)

Anyway...त्यांनी शेवटी विद्येची देवता गणपतींची मदत घ्यायचे ठरविले. मजेदार गोष्ट अशी कि, आपले देव देवता ना... सरळ पणे हो किंवा नाही म्हणणार नाही...काहीतरी तिसरा मार्ग काढतील. ह्या आपल्या गोष्टीत पण तसेच घडले.

आपले गणपती बाप्पा हो म्हटले खरे, पण एका अटीवर..."मी लिहेन पण मला सांगताना तू एक क्षण भर जरी थांबलास तरी मी पुढे लिहिणार नाही". आता मात्र महर्षी वेदव्यासांच्या समोर प्रश्न होता, "नाही म्हटले तरी क्षणाचा १०० वा भाग इतका तरी वेळ मला पुढच्या श्लोकांसाठी लागेल. काय बरे करावे...??" अचानक त्यांना एक कल्पना सुचली आणि ते गणपतीना म्हणाले, "चालेल, पण माझीही एक अट आपल्याला मान्य करावी लागेल." गणपतीनी व्यासांकडे केवळ एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. "तुम्ही लिहिताना सगळे श्लोक समजून लिहावे लागतील हीच माझी अट" व्यास म्हणाले.

गणपतीनी ह्याला मंजुरी दिली. मग काय विचारता...इकडे ना थांबता वेदव्यास महाभारत कथन करत आहेत आणि इकडे अगदी क्षणभरही न थांबता गणपती लिहीत आहेत. कथन - लिखाण... कथन - लिखाण... असे non stop...चालू होते. मग मध्ये कधी एक वेळ अशी यायची कि, वेद्व्यासांच्या कल्पना आणि गणेशांची लेखणी अगदी बरोबरीला यायची ...आणि अश्या वेळी वेदव्यास कूट श्लोक सांगायचे( कूट श्लोक म्हणजे जे वाचकाला गोंधळून टाकतील... म्हणजे कथेच्या ओघाच्या विरुद्ध अर्थाचे श्लोक असायचे).

गणपतीना त्या कूट श्लोकांचा अर्थ समजायला क्षणार्ध लागायचा, आधी तसे ठरले होते ना कि सगळे श्लोक समजून लिहावे लागतील म्हणून. तर त्या तेवढ्या वेळात व्यास आपले पुढचे कितीतरी हजार श्लोक बनवून तयार ठेवायचे. परत वेग सारखा व्हायला लागला तर परत एक कूट श्लोक. (पूलं बोलले असते ," अरे वा, भलतीच मजा आहे"). एकंदरीत असे ते महाभारत कथा आणि लिखाणाचे गणित होते.

एक मला श्लोक अंधुकसा आठवतो.
केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:।
रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव ॥*

आता वाचकाला प्रश्न पडतो कि, कृष्णाच्या पाण्यात पडण्यामुळे पांडव का खुश झाले आणि कौरव का रडले? जेव्हा कि उलट व्ह्यायला हवे होते? ह्या श्लोकात 'पांडव' चा अर्थ म्हणजे 'पाण्यातील मासे' असा तर 'कौरव 'म्हणजे 'झाडावरचे कावळे' असा आहे. ह्याचा भावार्थ असा,
कुणाचे तरी शव( प्रेत) पाण्यात पडले, मासे खुश झाले पण कावळे दु:खी झाले.
तर असले भरपूर श्लोक महाभारतात आहे असे म्हणतात. महाभारताच्या पहिल्या वाचकाला भरपूर फिल्टर करावे लागले असेल नाही? (j.k.)

महर्षी व्यासांनी ह्या ग्रन्थाद्वारे जवळपास सगळ्याच विषयांबद्दल लिहिले आहे. जन्म, मृत्यू,संगोपन, विद्या शिक्षण, मनुष्य-स्वभाव, शत्रास्त्रे, खेळ, वास्तुशिल्पकारिता, आचार, विचार, संस्कार, वनस्पती, निसर्ग, इ. इ. एकूण काय...सगळेच जे माझ्या क्षुद्र मेंदूत येईल ते सगळे विषय अगदी मुद्देसूदपणे सविस्तर लिहिलेले आहेत. मी मूळ महाभारत वाचले नाही ...जो ग्रंथ घरी होता तो कितव्या आवृत्तीचा होता ते आता आठवतही नाही.

लिखाणाच्या बाबतीत मला नेहमी complex वाटायचा (मला न्यूनगंड हा शब्द अजिबात आवडत नाही का कुणास ठावूक?) आणि अजूनही वाटतो. आपल्या आधीच्या लोकांनी लिखाण कामात इतके मोठे बेन्च्मार्क्स उभे केले आहेत ना कि कधी कधी असे वाटते...असो... उगाच भावनावेगाने काही बोलून जायचे ...

तर सांगायचा मुद्दा असा कि असे कूट श्लोक जर तुम्हाला कुणाला आणखी माहित असतील तर कृपा करून कळवा.

माझी कांदाभजी ची प्लेट माझ्याकडे कधीपासूनची बघत आहे तर तिला न्याय द्यायलाच हवा. केवळ त्यामुळे हा ब्लॉग इथेच थांबवते नाहीतर माझ्याकडे पण व्यासांसारखा खूप मोठा कल्पनांचा सागर.... नाही पण एक छोटे डबके आहे! lolz...


(*हा श्लोक "निल्या म्हणे (http://nilyamhane.blogspot.com/)" च्या सांगण्याप्रमाणे दुरुस्त केला आहे. धन्यवाद!)
--------------------------------------******--------------------------------------

Friday, May 7, 2010

एक मार्मिक प्रश्न ...

यथा काष्ठं च् काष्ठं च् |
समेयातां महोदधौ ||
समेत्यच व्यपेयातां |
तत्द्वभूत्समागम:||

अगदी लहानपणी हे संस्कृत सुभाषित एका पुस्तकात वाचल्याचे आठवते. ते मनःपटलावर अगदी कायमचे कोरल्या गेले. त्याचा भावार्थ असा - ज्याप्रमाणे समुद्रात दोन लाकडे एकत्र येतात आणि एकत्र येवून दूर जातात त्याप्रमाणे प्राणीमात्रांचा सहवास असतो.

किती सहज गोष्ट आहे... पण प्रत्यक्ष जीवनात प्रचंड गुंतागुंतीतून का जावे लागते कळतच नाही. प्रत्येक व्यक्तीला एक दिवस दूर जाणे आहेच... मग ते दूर जाणे अंतराला अनुसरून असो किंवा काळाला अनुसरून!
आपण मात्र सगळ्या छोट्या छोट्या क्षणांना, गोष्टीना अगदी घट्ट कवटाळून बसतो. जणू काही आपण ह्या आपल्या मालकी हक्कांच्या क्षणांचे संरक्षण करीत असतो.
हो ..म्हणजे काय केलेच पाहिजे...करायला नको? असा सामान्य दृष्टीकोन असतो.
प्रत्यक्षात, आयुष्यात ज्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जवळपास सगळ्याच अदृष्ट स्वरूपाच्या असल्याचे आढळते. उदाहरणच द्यायचे झाले तर ...प्रेम, गोड आठवणी, सुगंध, श्रद्धा,नीती, दया, आत्मविश्वास, यादी बरीच मोठी आहे. तर ह्या गोष्टी हातात पकडून ठेवू शकत नाही किंवा कमी... जास्त मोजुही शकत नाही. मग त्यांना कवटाळून बसण्याचा अट्टाहास का?

--------------------------------------******--------------------------------------

Thursday, May 6, 2010

माझी स्वप्ने ...

नवीन फोन्ट इन्स्टाल केला तो चांगला चालतो की नाही ते बघायचे होते म्हणून हा लेख सुरु केला. आत्ताच एका मित्रासोबत बोलत असताना मी माझ्या विचित्र स्वप्ना बद्दल त्याला सांगत होते. तो ते ऐकून जरा चक्रावला आणि मला ही कल्पना सुचविली. माझ्या पहिल्या ब‍लॉग मध्ये मी माझ्या स्वप्नांबद्दल लिहिले आहेच म्हणा, पण हे जरा वेगळे प्रकरण आहे.

मला ना नेहमी एकाच स्वरूपाचे स्वप्न पडते. मी अश्या एका खूप मोठ्या मंदिरात आहे आणि मंदिराच्या गाभार्यात कुठल्यातरी देवाची मूर्ती आहे, नेमकी कुणाची ते दिसत नाही. मात्र एकदम सुरेख रांगोळी, सुवासिक अगरबत्त्या, पूजेची तयारी, फळे, फुले अगदी सगळे दिसते.

ह्याच्या पुढचा भाग मला नेहमी विचारात पाडतो. तो असा कि त्या मंदिराच्या भव्य गाभार्यात एक गरगरीत गोल पोट असलेला सोवळ्यातला पुजारी जो मला दिसतो ते पात्र म्हणजे मी असते. असे का? असा "जेंडर मी लोचा" माझ्याच स्वप्नात यायचा होता. लोकांना किती छान स्वप्ने पडतात. कुणी कुठले पारितोषिक घेतं, कुणी आयुष्यात यशस्वी होतय. आणि मी ...शी कुणाला बोलायाची पण सोय नाही हो... हे म्हणजे ..मला शब्दच सुचत नाही. मी आणि पुरुष अवतारात...कठीण आहे एकूण सगळच .

ह्याबद्दल ज्या कुणाला सांगितले तो खो-खो हसत सुटला. म्हणे तुला अशी सुप्त इच्छा बिच्छा होती कि काय पुजारी व्ह्यायची. काय बोलणार ह्यावर?
काय करावे काही सुचेना. त्या दिवशी एका दुकानात एक शक्ती ग्वैन (Shakti Gwain) नावाच्या लेखिकेचे सुंदर पुस्तक दिसले. " Creative Visualization" असे त्या पुस्तकाचे नाव. दोन चार पान चाळून बघितली तर पूर्ण वाचायची इच्छा झाली. त्यात अल्फा आणि बेटा (alpha and beta) अश्या मेंदूच्या दोन अवस्था सांगितल्या आहेत. सूक्ष्म आणि स्थूल असे मनाचे दोन भाग आपण नेहमी ऐकतो (conscious and subconscious) तर ह्या सूक्ष्म मनातली चलबिचल आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला जास्त प्रभावीत करते आणि जर वरचे वर आपण बेटा अवस्थेत जो विचार करतो तसे आपल्याला स्वप्न पडतात असे काहीसे त्या पुस्तकात आहे.

मी आता रोज रात्री बेटा अवस्थेत जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करून माझ्या स्वप्नातल्या "जेंडर लोचा" ठीक करण्याचा प्रयत्न करत असते.

So far...no luck...पण माझे प्रयत्न अगदी युद्ध पातळीवर चालू आहेत.

समाप्त: